Latest Posts

मान्सूनपूर्व तयारी : महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेची युद्धपातळीवर देखभाल व दुरुस्ती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील तापमान उच्चांक गाठत आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच अवकाळी पाऊस आणि त्यानंतर लगेचच सुरू होणाऱ्या मान्सूनमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. नागपूर परिमंडलात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग देण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांचा अनुभव आणि हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता, एप्रिल-मे महिन्यात नागपूरसह संपूर्ण विदर्भात असह्य उष्णता असते. त्यातच अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे वीज वितरण यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता असते. महावितरणची बहुतेक विद्युत यंत्रणा खुल्या वातावरणात असल्यामुळे, हवामानातील बदलांचा थेट परिणाम तिच्यावर होतो. यामुळे ग्राहकांना वीजपुरवठ्यात अडचणी येतात आणि ग्राहक सेवा विस्कळीत होते. या सर्व गोष्टींचा विचार करून, उन्हाळा आणि त्यानंतरचा पावसाळा वीज ग्राहकांसाठी सुखकर व्हावा, यासाठी महावितरणने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

या तयारीचा भाग म्हणून, महावितरणने विद्युत यंत्रणेच्या देखभालीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर लोंबकळत असल्याने त्या तारांवर घासतात आणि यामुळे शॉर्ट सर्किट सारख्या घटना घडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन, नागपूर आणि वर्धा जिल्हयात संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील विद्युत यंत्रणेची पाहणी करून आवश्यकतेनुसार झाडांच्या फांद्या तोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी संबंधितांची पूर्वपरवानगी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याव्यतिरिक्त, वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स बोर्ड आणि प्लास्टिकचे झेंडे यामुळेही वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे, वीजवाहिन्यांमध्ये अडकलेल्या अशा वस्तू तत्काळ काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सैल झालेले गार्डिंग आणि स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील लोंबत्या तारांना ताण देणे आणि सर्व खांब व त्यांचे ताण सुस्थितीत ठेवण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.

वीज उपकेंद्रांमधील रोहीत्रांचे योग्य व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे, रोहीत्रांमधील तेलाची पातळी तपासली जात आहे आणि ब्रिदरमधील सिलिका जेलचा रंग बदलल्यास ते तातडीने बदलले जात आहे. वीज वितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्व अनमोल आहे. याकरिता, रोहीत्रांचे अर्थिंग मजबूत करणे, तसेच पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स आणि मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महावितरणने नागरिकांना या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव महावितरणला आहे. ही देखभाल व दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हितासाठी आणि अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे, या काळात वीज ग्राहकांनी थोडा संयम दाखवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Latest Posts

Don't Miss