Latest Posts

मिशन लक्ष्यवेध योजनेद्वारे खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मिशन लक्ष्यवेध ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १२ निवडक क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू घडवणाऱ्या खाजगी अकादमींना

आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, क्रीडा साहित्य, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शूटिंग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, आणि कुस्ती या १२ खेळांसाठी कार्यरत असलेल्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

अकादमींना गटांप्रमाणे आर्थिक सहाय्य –

योजने अंतर्गत अकादमींच्या गुणवत्तेनुसार त्यांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाईल.

– अ वर्ग (76-100 गुण) : वार्षिक ₹ 30 लाख अनुदान
– ब वर्ग (51-75 गुण) : वार्षिक ₹ 20 लाख अनुदान
– क वर्ग (35-50 गुण) : वार्षिक ₹ 10 लाख अनुदान – हे आर्थिक सहाय्य पायाभूत सुविधा उभारणी, प्रशिक्षकांचे मानधन, क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षण उपकरणे यासाठी वापरता येणार आहे  इच्छुक अकादमींनी अर्ज करावा

राज्यातील इच्छुक क्रीडा अकादमींनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना जागतिक स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मिळणार आहेत.

Latest Posts

Don't Miss