– ग्राहकांच्या खिशाला चटका : महावितरणने एफएसीच्या माध्यमातून दरवाढ जाहीर केली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यातील जनतेला १ एप्रिलपासून वीज दरात सवलतीचा लाभ मिळणार असल्याचे चित्र होते. मात्र, महावितरणने (MSEDCL) या स्वस्त वीज प्रस्तावाला आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) स्वस्त वीज लागू करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे.
दरम्यान, महावितरणने ग्राहकांना मोठा धक्का देणारे परिपत्रक जारी करून घरगुती विजेच्या दरात थेट ६० पैसे प्रति युनिटने वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ इंधन समायोजन शुल्क (FAC – Fuel Adjustment Charge) च्या माध्यमातून आकारण्यात येणार आहे.
मागील वर्षीच्या महागड्या वीज खरेदीची भरपाई ग्राहकांकडून –
महावितरणच्या सूत्रांनुसार, मागील वर्षी उन्हाळ्यात व मान्सूनमध्ये वीजउत्पादन कमी झाल्याने महावितरणला बाहेरून महाग वीज खरेदी करावी लागली. आता त्या खर्चाची भरपाई वसूल करण्यासाठी मार्च महिन्यात वापरलेल्या विजेवर इंधन समायोजन शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ३० मार्च २०२० रोजी आयोगाच्या आदेशाच्या आधारे आकारण्यात येत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
वीज मागणी ३० हजार मेगावॅटच्या उंबरठ्यावर –
सध्या राज्यातील वीज मागणी ३० हजार मेगावॅटच्या जवळ पोहोचली आहे. ७ एप्रिल रोजी राज्यात विक्रमी २९ हजार ४११ मेगावॅट वीज मागणी झाली होती. त्यात केवळ मुंबईचीच मागणी ३ हजार ७५३ मेगावॅट इतकी होती.
दुसरीकडे चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळ येथील प्रत्येकी एक वीज उत्पादन युनिट बंद असल्याने महावितरणला महाग वीज खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत देखील एफएसीच्या माध्यमातून वीज दरवाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.
दरवाढ कोण किती भरेल?
महावितरणच्या नव्या परिपत्रकानुसार विविध ग्राहक वर्गावर खालीलप्रमाणे दरवाढ होणार आहे.
ग्राहक वर्ग दरवाढ प्रति युनिट –
घरगुती ग्राहक- ६० पैसे
व्यावसायिक ग्राहक- ४० ते ६० पैसे
कृषी ग्राहक- १५ ते ३० पैसे
पथदिवे- ३० ते ३५ पैसे
पाणीपुरवठा योजना- ३० ते ३५ पैसे
ईव्ही चार्जिंग स्टेशन- ४० पैसे
उद्योग- ३५ ते ४० पैसे
ग्राहकांना पुन्हा आर्थिक फटका –
महावितरणच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह व्यापारी, कृषी व उद्योग क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या नागरिकांवर आता विजेचा अतिरिक्त भार पडणार आहे.
