Latest Posts

नझूल जमिनी फ्री-होल्ड करण्याकरीता कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : नागपूर विभागातील भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या नझूल जमीनी शासन निर्णयानुसार फ्री-होल्ड (भोगवटदार वर्ग १) करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी नझूल जमीनधारकांनी कागदपत्रासह अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

भाडेपट्टीने देण्यात आलेली नझूल जमीन वर्ग १ मध्ये झाल्यास भाडेपट्टी धारकांना नझूल जमीनीचे मालकी हक्क प्राप्त होऊन जमीनीची विक्री करण्यास अथवा हस्तांतरण करण्यास सोईचे होणार आहे. त्यामुळे भाडेपट्टी धारकांनी आपल्या नझूल जमीनीचे प्रथम भाडेपट्टयाचे नुतणीकरण करुन घ्यावे.

भाडेपट्टाधारकाने भाडेपट्टा संपुष्टात आलेला असल्यास प्रथम भाडेपट्याचे नुतणीकरण व सर्व प्रकारच्या शर्तभंगाचे नियमितीकरण प्रचलित धोरणानुसार करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच जमीन फ्री-होल्ड करण्याबाबत आवश्यक बाबीची पुर्तता झालेली आहे, याची खात्री करुन निर्धारित करण्यात आलेल्या रुपांतरण अधिमुल्याचा भरणा करुन घेऊन अशी भाडेपट्टयावरील नझूल जमीन फ्री-होल्ड करण्याबाबतचे आदेश पारित करण्यात येणार आहे.

भाडेपट्टयाच्या संदर्भात यापूर्वी कोणत्याही स्वरुपाचा शर्तभंग झाला  असेल तर तो शर्तभंग विहीत रक्कम भरुन नियमानुकूल करण्याचे आदेश संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पारित झाल्यानंतर तो नझूल भूखंड फ्री-होल्ड करण्यास पात्र होईल. ज्या भाडेपट्टाधारकांना नझूल जमीनी फ्री-होल्ड करण्याच्या सवलतीचा लाभ घ्यावयाचा नसेल त्या भाडेपट्टाधारकांना प्रचलित धोरणानुसार सदर भाडेपट्टा पुढे चालू ठेवता येईल. धर्मादाय, सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या नझूल जमीनी फ्री-होल्ड (भोगवटदार वर्ग १)  करण्यात येणार नाही.

नझूल जमीनी फ्री-होल्ड करतांना निवासी प्रयोजनासाठी संबंधित जमीनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणा-या बाजारमुल्यांच्या ५ टक्के आणि वाणिज्यीक, औद्योगिक प्रयोजनासाठी संबंधित जमीनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणा-या बाजारमुल्याच्या १० टक्के इतके रुपांतरण अधिमुल्य आकारुन सदर नझूल जमीनी फ्री-होल्ड करण्यात येणार आहे. निकषाची पुर्तता करीत असलेल्या सर्व नझूल भूखंडधारकांनी नझूल जमीन फ्री होल्ड करण्याकरीता संबंधित उपविभागीय अधिकारी तथा नझूल अधिकारी यांच्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss