Latest Posts

हरवलेले व चोरीला गेलेले ७२ मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

– सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडून शोध घेतलेले एकूण ११ लाक ११ हजार ६००/- रुपये किंमतीचे मोबाईल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते तक्रारदारांना सुपूर्द

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आजकाल तरुणपिढी मोठया प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदविली जाते.

याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचेकडून सायबर अपराध व मोबाईल चोरीच्या गुन्ह्रांबाबत सतर्क राहून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोली यांचे मार्फत तांत्रिक कौशल्याच्या आधारे सदर चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात असतो.

मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रीक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येत असतो.

सायबर पोलीस ठाणे, गडचिरोली यांचेकडून मागील वर्षी सन २०२४ मध्ये एकुण ११९ मोबाईलचा शोध घेण्यात आला असून त्यांची अंदाजे किंमत एकुण १९ लाक ३१ हजार ९१२/- रुपये एवढी होती. तसेच तसेच माहे सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या ५३ मोबाईलचा शोध घेवुन ०७ जानेवारी २०२५ रोजी सदर शोध घेण्यात आलेल्या मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले होते.

यासोबतच माहे जानेवारी २०२५ ते जून २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या एकुण ११ लाक ११ हजार ६००/- रुपये किंमतीच्या ७२ मोबाईलचा गडचिरोली पोलीस दलामार्फत शोध घेण्यात आलेला असून, आज ०४ जूलै २०२५ रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीसअधीक्षक कार्यालय येथील मिटींग हॉल येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे. सन २०२५ या वर्षात आतापर्यंत सायबर पोलीस ठाणे, गडचिरोली यांचेकडून अंदाजे १९ लाक ६७ हजार १६१/- रुपये किंमतीच्या एकूण १२५ मोबाईल फोनचा शोध घेण्यात आलेला असून ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत.

कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जनतेला आवाहन केले की, सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारं मार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते.

मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in  या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलीसांवर विश्वास ठेऊन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा. जेणेकरुन आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल आपल्याला परत मिळू शकतो तसेच अज्ञातांकडून आपल्या मोबाईलचा गैरवापर केला गेल्यास आपण सुरक्षित राहतो.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक व अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली गोकुळ राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि. नेहा हांडे, मपोहवा/६३८ वर्षा बहिरवार, पोअं/संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss