विदर्भ न्यूज प्रतिनिधी
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : लग्नपत्रिका वाटून दुचाकीवरून परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक राहुल शेंडे याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना १९ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील कापसी- व्याहाड बुज रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सावली तालुक्यातील सामदा येथील रहिवासी राहुल विनायक शेंडे (३०) हा त्याच्या भाऊजी ची होंडा शाईन क्रं. एमएच ३४ सीए ५७६४ ने आपल्या मेव्हणीचे लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेले होते. लग्नपत्रिका वाटप करून ते सकाळी ९.१५ वाजता दुचाकीवरून गावाकडे परतत असताना कापसी- व्याहाड बूज या रस्त्यावर अचानक त्यांची दुचाकीवरील ताबा सुटून ती घसरली. माहितीच्या आधारे सावली पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याचे दिसले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
पुढील तपास सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश शेंडे करत आहेत.
