Latest Posts

जुनोना जंगलात अपघातांची मालिका कायम : अज्ञात वाहनाच्या धडकेत नर चितळाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): जुनोना जंगल परिसरात वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच असून, अवघ्या १३ दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एक गंभीर घटना समोर आली आहे. आज रात्री १ वाजताच्या दरम्यान जुनोना–चिचपल्ली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मोठ्या नर चितळाचा मृत्यू झाला आहे.

हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे सदस्य शाहबाज शेख व नौशाद सय्यद हे गिलबिली येथे कामानिमित्त जात असताना पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास त्यांना रस्त्याच्या कडेला एक नर चितळ मृतावस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून पाहणी केली असता, सदर चितळाचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे यांना देण्यात आली. तसेच वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहाय्यक पांचाळ यांनाही याबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चितळाचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शाहबाज शेख यांनी हा अपघात तासाभरापूर्वीच घडल्याचा अंदाज व्यक्त केला. यावेळी जावेद शेख व मुरासत अली हेही उपस्थित होते.

दरम्यान, जुनोना–चिचपल्ली मार्गाच्या रुंदीकरणास हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीने यापूर्वीच विरोध दर्शविला होता. हा परिसर वन्यजीवांच्या महत्त्वाच्या भ्रमणमार्गात येत असल्याने, रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग वाढून वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. तसेच वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर, बॉक्स कल्व्हर्ट उभारणे व सायंकाळी ६ नंतर मार्ग बंद ठेवण्यासारख्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तोंडी आश्वासन देत रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण केल्याने आता त्याचे दुष्परिणाम समोर येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या मार्गावर वाघ, अस्वल, बिबट, चितळ, सांबर, रानमांजर, सरीसृप आदी विविध वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अलीकडेच कारवा परिसरात एका रानगव्याला जखमी अवस्थेत पाहण्यात आले होते.

यापूर्वी झालेल्या बिबट्याच्या अपघातानंतरही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून उपाययोजनांची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक अंबुले यांना देण्यात आलेल्या पत्रालाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता एखाद्या वाघाचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मृत चितळाचे शवविच्छेदन जुनोना वनपरिक्षेत्र कार्यालयात करण्यात आले. यावेळी हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे अभिषेक गजबे, पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडसेलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, क्षेत्र सहाय्यक पांचाळ, वनरक्षक लुटे तसेच वनमजूर उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss