Latest Posts

आर्वी येथे रोजगार मेळाव्यात ३६ उमेदवारांची प्राथमिक निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (wardha) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वीच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात ३६ उमेदवारांची प्राथमिक तर ७ उमेदवारांची अंतीम निवड करण्यात आली.

मेळाव्याचे उद्घाटन नायब तहसिलदार साईकिरण आऊतवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ॲङ शोभा काळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र सोनटक्के, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे धिरज मनवर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर यांची उपस्थिती होती.

मेळाव्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक नागपूर, सत्या मायक्रोफायनान्स नागपूर, इंटीग्रेटेड सोल्यूशन प्रायवेट लिमिटेड मुबंई या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपन्यांची त्यांच्या रिक्त असलेल्या १३७ पदासाठी १६० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी ३६ उमेदवारांची प्राथमिक तसेच ७ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत कृषक इंग्लीश प्रायमरी स्कुल आर्वी, विद्यानिकेतन इंग्लीश स्कूल आर्वी व मॉडेल हायस्कुल रोहणाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये ३० उमेदवारांची प्राथमिक व ९ उमेदवारांची अंतिम निवड प्रशिक्षणार्थी म्हणून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास विभागाचे अतुल वऱ्हेकर, प्रकाश कळमकर, महाविद्यालयाचे प्रा.डॉ. नीरज केंढे, प्रा. शैलेश खंडारे व इतर प्राद्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss