– जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे आवाहन
– सहभागासाठी ३१ जुलै शेवटची तारीख
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा नुकसानीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिकविमा योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या सुधारीत पिकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
राज्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी अधिसूचित पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, उडीद, मुंग या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे.
अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येतो. योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. योजनेत सहभाग होण्याकरिता जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपल्या पिकाचा विमा उतरवून घ्यावा, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
