विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी (Armori): आरमोरी- ब्रम्हपुरी रस्त्यावर मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात एका ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून टिप्परचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात मंगळवार २४ जून रोजी रात्री ९.१५ ते ९.३० च्या सुमारास साई मंदिराजवळ घडला. यावेळी एमएच ३५-एजे-३३१२ क्रमांकाच्या आयशर कंपनीच्या १० चाकी टिप्परचा चालक भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत असताना त्याने रस्त्याने जात असलेल्या छगनलाल वासुदेव कोडपे (वय ७२, रा. बर्डी, आरमोरी) यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या छगनलाल कोडपे यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, आरमोरी पोलिसांनी आरोपी वाहन चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे हे करीत आहेत.
