Latest Posts

मध्यप्रदेशातील घरफोडी टोळी जाळ्यात : चंद्रपुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ५७.५० लाखांचा ऐवज जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर ( chandrapur ) : शहरातील सलग घरफोडीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व रामनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राकेश मंगलसिंग मेहडा (वय २५), रा. बघोली, ता. कुकशी, जि. धार कंचन भगतसिंग मंडलोही (वय ४०), रा. बघोली, ता. कुकशी, जि. धार, यानसिंग मेहतू भुरिया (वय २६), रा. बडीउपी, ता. जोबट, जि.अलीराजपूर आणि महेश कालू भुरिया (वय २५), रा. गुराडिया, ता. कुकशी, जि. धार असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, वडगाव येथील चिंतामणी रेसिडेन्सीमध्ये राहणारे शुभम प्रदीप बारचमवार (वय ३०) हे ६ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नासाठी राजुरा येथे गेले होते. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी घरी परतल्यानंतर घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

त्याच दिवशी शेजारील सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ज्योती दिनेश चंदनपाट (वय ५४) यांच्या घरातही अशाच प्रकारे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल काचोरे व पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा सलग १० ते १२ दिवस अभ्यास केला. तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी हे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशातील धार व परिसरात धाड टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेले ३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत ५१ लाख ९८ हजार  रुपये, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन क्रमांक GJ 14-AP 4098, किंमत सुमारे ५ लाख रुपये) तसेच सहा मोबाईल असा एकूण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी यापूर्वी चार घरफोड्या केल्याची कबुली दिली असून या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे तसेच पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार तसेच रामनगर व सायबर पथकातील पोहवा आनंद खरात, पोअं संदीप कामडी, प्रकाश मडावी, प्रफुल पप्पुलवार, पंकज ठोबरे, पोहवा कार्तिक खनके, विरू यादव, पोअं वैभव पत्तीवार, गुणवंत मुंडके यांनी केले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss