Latest Posts

हिमाचल प्रदेशात भीषण बस अपघात : ५ जणांचा मृत्यू, २० हून अधिक गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / हिमाचल प्रदेश (Himachal pradesha): हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकाघाट परिसरात मसेरनजवळील तरांगला येथे बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एचआरटीसी) ची बस खोल दरीत कोसळल्याने पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही बस सरकाघाटहून जमनी दुर्गापूरकडे जात असताना सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण २० ते २५ प्रवासी होते. तरांगला परिसरात पोहोचताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट खोल दरीत कोसळली.

अपघात इतका भीषण होता की बस पूर्णतः चकनाचूर झाली आणि अनेक प्रवासी बसच्या आत अडकले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी मोठ्या तत्परतेने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. त्यांनी पोलिस व प्रशासनाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच १०८ रुग्णवाहिका तसेच सरकाघाट पोलीस ठाण्याचे डीएसपी संजीव गौतम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक मदतकार्य राबवत जखमींना रुग्णवाहिकांमधून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती डीएसपी संजीव गौतम यांनी दिली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने अपघातस्थळी पंचनामा करून घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी वाहनाच्या तांत्रिक बिघाडाचा अथवा तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिकांनी दाखवली मानवतेची जाणीव –

या भीषण घटनेनंतर स्थानिकांनी दाखवलेली तत्परता आणि मदतीची भावना विशेष कौतुकास्पद ठरली. जीव धोक्यात घालून अनेकांनी प्रवाशांना बाहेर काढलं आणि सुरक्षीत ठिकाणी हलवलं.

प्रशासनाकडून या अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून अपघातग्रस्त कुटुंबीयांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

अपघातांची मालिका आणि सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह –

या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा पर्वतीय रस्त्यांवरील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. जड वाहने व अरुंद रस्ते यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन –
पर्वतीय भागांत प्रवास करताना वेग मर्यादा, वाहनांची नियमित तपासणी आणि प्रशिक्षित चालक यावर भर देण्याचं आवाहन पोलिस व प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Latest Posts

Don't Miss