–३० जुन पर्यंत मुदतवाढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : १ एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३० जुन पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून वाहन धारकांनी आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवून घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी केले आहे.
जिल्ह्यात आज पर्यंत ३ हजार ९६० वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात आली असून २० हजार ३२७ वाहनधारकांनी पाटी बसविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. जिल्ह्याकरीता मे रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. या एजन्सी मार्फत वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी व समुद्रपूर येथील अधिकृत फिटनेस सेंटरमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यात सेवा पुरवठा धारकांकडून लवकरच फिटनेस सेंटर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
सदर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरीता दुचाकी व ट्रॅक्टरसाठी जीएसटी वगळून ४५० रुपये, तिनचाकी वाहनासाठी ५०० रुपये व इतर सर्व वाहनांकारीता ७४५ रुपये आकारण्यात येणार आहे. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्यासाठी मे रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड या कंपनीच्या https://hsrpmhzone2.in या पोर्टल वर अर्ज करुन नंबर पाटी आरक्षित करता येणार आहे.
एका ठिकाणी किमान २५ किंवा यापेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस व ट्रक मालकांनी नोंदणी क्रमांक पाटी लावण्यासाठी अर्ज केल्यास कंपनीकडून सबंधीत ठिकाणी किंवा हाऊसिंग सोसायटी मध्ये सबंधीत एजन्सी मार्फत कोणतेही होम फिटनेस शुल्क न आकारता नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे स्नेहा मेढे यांनी सांगितले.
