विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जम्मू काश्मीर (Jammu Kashmir): लडाखमधील संवेदनशील गलवान खोऱ्यातील चारबाग भागात बुधवारी सकाळी लष्करी ताफ्यावर दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी शहीद झाले, तर तिघे अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दुर्बुक ते चोंगटास या मार्गावर लष्करी प्रशिक्षण सहलीदरम्यान घडला.
अपघातग्रस्त लष्करी वाहन दुर्बुकहून चोंगतासच्या दिशेने जात असताना सकाळी ११:३० वाजता चारबाग परिसरात अचानक दरड कोसळली. दरड कोसळताना मोठ्या प्रमाणावर दगड आणि मातीच्या गडगडाटाने वाहनावर आघात झाला. त्यामुळे वाहनाचे पूर्णतः नुकसान झाले आणि त्यातील अधिकारी गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेत १४ सिंध हॉर्स रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग हे शहीद झाले. तर मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० आर्म्ड) हे गंभीर जखमी झाले आहेत. तिन्ही जखमी अधिकाऱ्यांना तातडीने भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे लेह येथील १५३ जीएच रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लष्कराकडून अधिकृत निवेदन –
फायर अँड फ्युरी कॉर्प्स च्या वतीने लष्कराने अपघाताबाबत माहिती दिली आहे. ३० जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता लडाखच्या चारबाग परिसरात लष्करी वाहनावर दरड कोसळून अपघात घडला. बचाव आणि मदत कार्य तत्काळ सुरू करण्यात आले असून अन्य ताफ्यालाही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
काही महिन्यांतील सर्वात गंभीर दुर्घटना –
सैन्य दलासाठी हा अपघात अतिशय वेदनादायक असून गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठा लष्करी वाहन अपघात मानला जात आहे. यापूर्वी, मे महिन्यात जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराचा ट्रक २००-३०० मीटर खोल दरीत कोसळल्याने तिघे जवान शहीद झाले होते. तो ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता.
शोककळा –
शहीद अधिकाऱ्यांच्या निधनामुळे लष्करात हळहळ व्यक्त होत आहे. संरक्षण मंत्रालयातर्फे शहीद अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लष्करी ताफ्यांच्या हालचालीसाठी लडाखसारख्या दुर्गम भागात अधिक दक्षता घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
