विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काहीजण चोरीछुप्या मार्गाने दारूची वाहतूक आणि विक्री करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्रेत्यांवर जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून २० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.
मौजा शिवणी (ता. व जि. गडचिरोली) येथील रहिवासी मनोज वामन ऊईके हा आपल्या स्विफ्ट चारचाकी वाहनातून गडचिरोली शहरात देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
गडचिरोली–चामोर्शी मार्गावर सेमाना मंदिराजवळ सापळा रचण्यात आला. संशयित वाहन वेगात येताना दिसल्यावर पोलीसांनी अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २५ बॉक्स देशी दारू व ४ बॉक्स विदेशी बिअर असे सापडले.
त्यानुसार दारू व मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहन असा एकूण ६,३८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान, सदर दारूचा साठा किरण ताटपल्लीवार व लखन ऊर्फ लंकेस यांच्याकडून घेतल्याची माहिती आरोपी मनोज ऊईके याने पोलिसांना दिली.
त्यानुसार गडचिरोली पोलीस स्टेशन येथे कलम ६५(अ), ९८(२), ८३ महा. दा. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मनोज ऊईके याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, तसेच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, पोहवा/दंडीकवार, पोअं/पंचफुलीवार, पोअं/कोडाप यांनी ही धडक कारवाई केली.
या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सफौ/ कैलास नरोटे करीत आहेत.
