Latest Posts

गडचिरोलीला स्वतंत्र डाक विभागाची मान्यता : ४३ वर्षांची प्रतीक्षा संपली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झालेला गडचिरोली जिल्हा तब्बल ४३ वर्षांपासून स्वतंत्र डाक विभागाच्या प्रतिक्षेत होता. अखेर ही प्रतिक्षा संपली असून केंद्र सरकारच्या टपाल विभागाने २८ जुलै रोजी अधिकृत पत्राद्वारे गडचिरोलीला स्वतंत्र डाक विभाग म्हणून मान्यता दिली आहे. लवकरच गडचिरोलीमध्ये स्वतंत्र मुख्य पोस्ट कार्यालयाची स्थापना होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्ह्यातील टपाल सेवा अधिक गतिमान, सुलभ आणि प्रभावी होणार आहे.

चंद्रपूरच्या अधिपत्याखाली गडचिरोलीची सेवा –
आजवर गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे चंद्रपूर डाक विभागांतर्गत कार्यरत होते. चंद्रपूरचे १५ तर गडचिरोलीचे १२ तालुके या विभागात येत होते. अहेरी, सिरोंचा, भामरागड यांसारख्या अतिदुर्गम तालुक्यांमध्ये टपाल सेवा पोहोचवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय, स्थानिकांना टपालसंबंधित तक्रारी किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूरला प्रवास करावा लागत होता.

दीर्घकाळच्या मागणीला यश –
गडचिरोलीसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. भारतीय पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि चंद्रपूर – गडचिरोलीतील लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठबळ दिले.

या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावे केंद्र सरकारच्या टपाल विभागाने २८ जुलै रोजी अधिकृत पत्र जारी करत गडचिरोलीला स्वतंत्र डाक विभागाचा दर्जा बहाल केला.

निर्णयाचे महत्त्व –
या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्याला प्रशासकीय स्वायत्तता लाभणार आहे. स्थानिक पातळीवर त्वरित निर्णय घेणे शक्य होणार असून, सेवा पोहोचवण्याचे काम अधिक परिणामकारक होईल. दुर्गम भागांतील नागरिकांना आता टपाल कार्यालयीन सेवा आपल्या जिल्ह्यातच मिळणार असल्यामुळे वेळ, पैसे आणि श्रम वाचणार आहेत.

ऐतिहासिक पाऊल –
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली, पण डाक विभागाचे विभाजन न झाल्यामुळे जिल्ह्याचा टपाल कारभार चंद्रपूर येथूनच चालवावा लागत होता. मात्र, २८ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे. लवकरच गडचिरोलीत स्वतंत्र मुख्य पोस्ट कार्यालयाची उभारणी करण्यात येणार असून त्याद्वारे स्थानिकांना सुलभ, वेगवान आणि दर्जेदार सेवा मिळणार आहेत.

हा निर्णय केवळ टपाल विभागापुरता मर्यादित न राहता, गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss