विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांचा पाठपुरावा व हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासुची तयार करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
यासाठी अन्न व कृषि प्रक्रिया उद्योग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे तसेच बँकेचा पाठपुरावा करुन कर्ज मंजूर करुन घेण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती, यामध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, बँक अधिकारी, बँक मित्र, विमा प्रतिनिधी, वैयक्तिक व्यावसायिक, सहाय्य सल्लागार संस्था, सूक्ष्म अन्न व्यवसायाठी मदत करणाऱ्या व्यक्ती, नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापिठ, संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी मधील पदविका, पदवी, कृषि पदवीधर किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर ज्यांना सविस्तर शासकीय प्रकल्प अहवाल तयार करण्याचा अनुभव आहे, अशा व्यक्तींकडून संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छुक पात्र व्यक्तींनी शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या कागपत्रासह १० मे पर्यंत अर्ज सादर करावे. अर्जचा नमुना, सविस्तर अटी व शर्ती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
