Latest Posts

गडचिरोलीतील एकता पार्कचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे : अल्पावधीतच गट्टू निघण्यास सुरुवात

– चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची आ. रामकृष्ण मडावी यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): शहरातील नागरिकांसाठी विश्रांती व प्रेरणास्थान म्हणून उभारण्यात आलेल्या एकता पार्कच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नगरपरिषद गडचिरोली अंतर्गत कॉम्प्लेक्स परिसरातील शासकीय विश्रामगृहासमोर छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांसह विकसित करण्यात आलेल्या या पार्कमध्ये काहीच महिन्यांतच गट्टू बाहेर निघणे, काँक्रीट फुटणे यासारख्या त्रुटी स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत.

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते रामकृष्ण मडावी यांनी सदर पार्कच्या कामाची पाहणी करताना हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदाराविरोधात चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची तसेच बाकी असलेली कोणतीही देयके तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

अशा प्रकारची कामे केवळ उद्घाटनासाठी केली जात असतील, तर त्याचा नागरिकांना दीर्घकाळ उपयोग कसा होणार? शहरी भागातच अशी अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील कामांचा दर्जा काय असेल, असा प्रश्न निर्माण होतो, असे मडावी यांनी नमूद केले.

एकता, प्रेरणा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असणाऱ्या या पार्कच्या माध्यमातून समाजाच्या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्याचा उद्देश आहे. मात्र संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे या उद्देशाला गालबोट लागल्याचे नागरिकांचे मत आहे.

पार्कच्या कामासंबंधीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार मडावी यांनी केली आहे.

यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम उप अभियंता अंकुश भालेराव यांना संपर्क केला असता सदर काम व्यवस्थित असून कामात कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. तर कंत्राटदार कंपनी मे. आर. आर. कंट्रक्शन यांनी सांगितले की सदर बांधकाम पूर्ण होऊन नगर परिषदेला हस्तांतरित करून दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे व काम योग्य पद्धतीने करण्यात आलेला होता. त्यानंतर नगरपरिषदेने पार्कमध्ये काही काम करण्यास जेसीबी नेल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस फुटून गट्टू निघाले असावे असा अंदाज व्यक्त केला.

Latest Posts

Don't Miss