Latest Posts

सायबर गुन्हेगारीचा केंद्रबिंदू गोल्डन ट्रॅंगल : नागपूरसह देशभरात वाढत्या फसवणुकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : देशभरासह नागपुरातही सायबर गुन्ह्यांची प्रचंड वाढ होत असून, गुन्हेगार नव्या-नव्या क्लृप्त्या वापरून नागरिकांना लाखो-कोटींनी गंडवत आहेत. आता देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून सायबर गुन्हेगारीचे जाळे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या देशांचा समावेश असलेल्या तथाकथित गोल्डन ट्रॅंगल मधून सायबर फसवणुकीचे संचालन होत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

जामताराहून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत प्रवास –
पूर्वी झारखंडमधील जामतारा आणि देशातील इतर सुमारे २० हॉटस्पॉट्स सायबर गुन्ह्यांचे केंद्र मानले जात होते. मात्र, आता कंबोडिया, म्यानमार आणि लाओस या देशांमधून थेट आंतरराष्ट्रीय स्वरूपात सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवले जात आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या तपासात याचे धक्कादायक पुरावे मिळाले असून, देशभरातील अनेक प्रकरणांत गोल्डन ट्रॅंगलचा थेट संबंध आढळला आहे.

चिनी गुन्हेगारी रॅकेटचा हात –
या संपूर्ण रॅकेटचे सूत्रसंचालन प्रामुख्याने चायनीज गुन्हेगारांकडून केले जात आहे. त्यांच्या भारतातील एजंट्स नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे फसवण्यासाठी काम करत आहेत. अलीकडेच नागपुरातील एका फसवणूक प्रकरणात आणि केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शशिधरन नांबियार यांच्या ९० लाख रुपयांच्या फसवणुकीतही चायनीज सायबर सिंडिकेटचा सहभाग स्पष्ट झाला आहे.

तरुणांना गुन्ह्यांच्या दलदलीत ढकलण्याचे प्रकार –
गोल्डन ट्रॅंगल भागात रोजगाराच्या निमित्ताने गेलेल्या भारतीय तरुणांना जबरदस्तीने सायबर गुन्ह्यात सामील करण्यात येते. त्यांना ब्लॅकमेल करून, अपहरण करून किंवा धमकावून भारतीय नागरिकांना फसवण्याचे काम सोपवले जाते. ठराविक टार्गेट पूर्ण केल्यास काही मोबदला दिला जातो, अन्यथा अत्याचार केल्याचेही तपासात समोर आले आहे.

बिटकॉइनद्वारे पैशांची उचलफेक –
सायबर फसवणुकीतून मिळवलेले पैसे प्रथम भारतात एजंटांनी भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांमध्ये वळवले जातात. त्यानंतर ते पैसे चायनीज गुन्हेगारांकडे पोहोचवून बिटकॉइनमध्ये रूपांतरित केले जातात. यानंतर ही रक्कम सिंडिकेटमधील विविध गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जाते. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हे व्यवहार लपवले जातात, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसाठी या पैशांच्या ‘मनी ट्रेल’चा मागोवा घेणे मोठे आव्हान ठरत आहे.

सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान –
गोल्डन ट्रॅंगलमधून चालवली जाणारी सायबर गुन्हेगारी ही केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही मोठा धोका बनली आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा यंत्रणांनी आपले नेटवर्क अधिक बळकट करून अशा आंतरराष्ट्रीय सिंडिकेटविरोधात संयुक्त मोहीम हाती घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Latest Posts

Don't Miss