Latest Posts

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाने निकाल जाहीर करण्याच्या सर्व तयारी पूर्ण केल्या असून निकालाबाबतची अधिकृत माहिती उद्या सकाळी पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.

८० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
यंदा बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्याआधी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा पार पडल्या होत्या. यावर्षी एकूण ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा –
बारावीच्या परीक्षा पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या. या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा निकाल एकाच वेळी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निकाल कुठे पाहता येईल? 
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर व पासवर्ड जवळ ठेवणे आवश्यक आहे.

– http://mahahsscboard.in
– http://mahresult.nic.in
– http://hscresult.mkcl.org
http://hsc.mahresults.org.in

महत्त्वाच्या सूचना –
– निकाल पाहताना विद्यार्थ्यांनी शांततेने व काळजीपूर्वक आपले तपशील भरावेत.
– वेबसाईटवर तांत्रिक अडचणी आल्यास थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करावा.
– निकालाची प्रिंट काढून ठेवणे किंवा स्क्रीनशॉट घेणे योग्य ठरेल, कारण हे अनौपचारिक निकाल असतात.

उद्या पत्रकार परिषदेनंतर मंडळाकडून अधिक माहिती जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांसाठी खुला होईल.

Latest Posts

Don't Miss