– तहसील कार्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : मुख्यमंत्री यांच्या १०० दिवस अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आर्वी तालुक्यातील ३२ हजार ६० पात्र शिधापत्रिकाधारकांना तहसिल प्रशासनाच्या वतीने ई-शिधापत्रिकेचे घरपोच वितरण करण्यात येणार आहेत. घरपोच इ-शिधापत्रिका उपक्रमाचा शुभारंभ आमदार सुमित वानखेडे यांच्या शुभहस्ते सालधरा येथील कार्डधारक हरिश्चंद्र कासार यांना क्यूआर कोड आधारित डिजिटल शिधापत्रिका वाटप करून करण्यात आला. तसेच सेवा पंधरवडा व दाखल्याची शाळा अंतर्गत नितीन कदम यांना प्रातिनिधीक स्वरूपात जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र देण्यात आले.
तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत नागरिकांना शिधापत्रिका वितरीत करण्यात येतात. दुय्यम शिधापत्रिका मिळवण्याकरिता तहसील कार्यालयात नेहमी गर्दी असते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये शिधापत्रिका दाखवणे आवश्यक असते. तसेच शासनाने आता क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुषंगाने नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी आर्वी तहसील कार्यालयाच्या वतीने घरपोच ई-शिधापत्रिका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांची गैरसोय थांबावी व त्यांचा त्रास वाचवा यासाठी आर्वीचे तहसीलदार हरिष काळे यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमांतर्गत आर्वी तालुक्यातील एकूण ३२ हजार ६० पात्र शिधापत्रिकाधारकांना तहसिल प्रशासनाच्या वतीने ई-शिधापत्रिकेचे घरपोच वितरण करण्यात येणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री जन मन योजनेंतर्गत आदिम जमाती बहुल ३५ गावामध्ये लाभार्थ्यांना घरपोच ई-शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार असुन पुढील टप्प्यात उर्वरित गावामध्ये टप्प्या टप्प्याने लाभार्थ्यांना घरपोच ई-शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार आहेत.
आर्वी तालुक्यात एकूण ३६ हजार ३२८ शिधापत्रिका असुन यामध्ये अंत्योदय योजनेतील ८ हजार ४०६, प्राधान्य गट योजनेतील २३ हजार ६५४, राज्य योजनेंतर्गत ए.पी.एल. शेतकरी शिधापत्रिका १ हजार २५ असून एन.पी.एच. गटातील २ हजार ९९ शिधापत्रिका आहेत. या मोहिमेत गावनिहाय ई-शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम आखला असुन मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी, ग्रामसेवक, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, कोतवाल यांच्या मार्फत ई-शिधापत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
या शिधापत्रिकांची विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना विविध कामासाठी व योजनासाठीआवश्यकता भासणार असते. यातून त्यांचा वेळ, श्रम व पैसा याची बचत व्हावी, यासाठी तहसील कार्यालयामार्फत सदर उपक्रम हाती घेतला आहे. उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट व आर्वी तहसीलदार हरिष काळे यांच्या पुढाकाराने नागरिकांना ई शिधापत्रिका घरपोच मिळणार आहे.
