विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरातील गोलपुलिया येथे नगरपरिषदेच्या सौंदर्यीकरणासाठी बसविण्यात आलेल्या फसाड लायटींगचे मोठे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नगरपरिषद बल्लारपूरतर्फे बल्लारपूर नगरपरिषद ते बस्ती परिसराकडे जाणाऱ्या गोलपुलिया येथे सुमारे एक वर्षापूर्वी शहर सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने फसाड लायटींगची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक आरजे १४ जीएन ७८८८ च्या चालकाने पुलाखालील मार्गातून वाहन नेताना निष्काळजीपणा केल्याची घटना घडली.
वाहनाची उंची अधिक असल्याची जाणीव असूनही चालकाने पुलाखालून वाहन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रक पुलीयाच्या आतील भिंतीला घासून गेल्याने तेथे बसविण्यात आलेले फसाड लायटींग, कंट्रोल पॅनल तसेच संपूर्ण वायरिंगचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत नगरपरिषदेच्या मालमत्तेचे सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने नगरपरिषद बल्लारपूर येथील विद्युत अभियंता कु. मोनिका बबनराव ढोके यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध कलम ३२४ (५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनकर धोबे करीत आहेत.
