विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : भंडारा जिल्ह्यातील तलावांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शेत उत्पादनात वाढ करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव, पारंपरिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
डॉ. फुके म्हणाले, तलावांतील गाळ काढल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शिवारात वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढते. ही योजना १५ जून पर्यंत प्रभावीपणे राबवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश आहेत.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन व अवनी ॲप चा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी तलाव परिसरात सामूहिक श्रमदान होणार असून, स्थानिक सहभागातून जलसंवर्धनाच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील.
कार्यशाळेत जलसंधारण अधिकारी महेश शेलुकर यांनी शासन निर्णय, योजनेची प्रक्रिया व अंमलबजावणी यावर सविस्तर माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नाम फाउंडेशनचे उमेश पाटील, प्रकल्प अधिकारी टाटा मोटर्स शैलेश माहुलीकर, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले की, ही योजना केवळ आजसाठी नव्हे, तर पुढील शंभर वर्षांकरिता जलसुरक्षा व शेती समृद्धी सुनिश्चित करणारी आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, सरपंच आणि सर्व घटकांनी समन्वय साधून कार्य करावे.
या कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, उपवनसंरक्षक राहुल गवई, प्रकाश बाळबुधे, माजी आमदार प्रदीप पडोळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी महेश सेलुकर, प्रकल्प अधिकारी टाटा मोटर्स शैलेश माहुलीकर, नाम फाउंडेशनचे उमेश पाटील, समन्वय प्रफुल सुतार, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एन. चाचीरे, उपकार्यकारी अभियंता भंडारा रोशन सेलूकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
