विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrapur) : भद्रावती येथील ताडोबा बार जवळील रोडवरून चालणाऱ्या भाजी विक्रेत्याला दुचाकी स्वाराने धडक दिल्याने भाजी विक्रेते पुरुषोत्तम बोबडे यांचा मृत्यू झाला. ही घटना १८ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता ताडोबा बार जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम दौलत बोबडे हे त्यांची पत्नी बेबी बोबडे, मुले रवी पुरुषोत्तम बोबडे, प्रवीण पुरुषोत्तम बोबडे आणि पुतणे अंकुश बंडू बोबडे हे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून भद्रावती येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी आले होते.
हे लोक रोज हातगाडीवर भाजी विकायचे. तसेच १८ एप्रिल रोजी सायंकाळी पुरुषोत्तम बोबडे हे भाजी विक्रीसाठी बाहेर पडले असता रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ते ताडोबा बारजवळील रोडवरून हातगाडी घेऊन चालले असता दुचाकी पॅशन प्रो क्रं एमएच ३४ बीएफ ६८९९ चा चालक उमाकांत भाऊराव कॉलर (३५) याने पुरुषोत्तम बोबडे यांना धडक दिली. या घटनेत पुरुषोत्तम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही माहिती त्यांचा पुतण्या अंकुश बंडू बोबडे यांना मिळताच त्यांनी दवाखाना गाठला असता डॉक्टरांनी काकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अंकुश बोबडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, भद्रावती पोलिसांनी उमाकांत भाऊराव कॉलर (३५), रा. गुरुनगर भद्रावती याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८४, आणि बीएनएस १०६(१), २८१ नुसार गुन्हा दाखल केले.या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार लता वाढीवे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र केदारे करत आहेत.
