विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील विसापुर येथील प्रभाग क्रमांक क्रमांक २ मधील असलेल्या धोबी घाट, विसर्जन घाटाचे आता लवकरच सौंदर्यीकरण होणार आहे. त्यामुळे गावातील गणेश विसर्जन, दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन व इतर धार्मिक कार्य करण्यासाठी घाट सौंदर्यीकरणामुळे नागरिकांना चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये अनेक दिवसांपासून विसर्जन घाटाच्या सौंदर्यीकरणाची मागणी होत होती. याबाबत स्थानिक ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटणकर, सुरज टोमटे यांनी भाजपा बल्लारपूर तालुका तथा दक्षता समितीचे अध्यक्ष किशोर पंदिलवार यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ बल्लारपूर बांधकाम विभागाला या जागेचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने सहायक अभियंता वैभव जोशी यांनी घाटाची पाहणी केली व लवकरच कामाचे अंदाजपत्रक पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल असे सांगितले.
यावेळी भाजपा युवा नेते गणेश टोंगे, ग्रामपंचायत सदस्य राजानन पाटणकर, सुरज टोमटे व ग्रामस्थ घाटावर उपस्थित होते.
