Latest Posts

अमृत भारत योजनेअंतर्गत नागपूर स्थानक होणार आधुनिक पुनर्विकासाचे आदर्श मॉडेल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील प्रमुख स्थानकांपैकी एक असलेले नागपूर रेल्वे स्थानक अमृत भारत स्थानक योजना (ABSS)
अंतर्गत आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, उन्नत प्रवासी सोयीसुविधा आणि दिव्यांगांना अनुकूल वैशिष्ट्ये यांच्या आधारे हे स्थानक भारतीय रेल्वेच्या स्मार्ट आणि सर्वसमावेशक पुनर्विकासाचे प्रतीक होणार आहे.

या स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. लाईन क्रमांक १८ आणि १९ दरम्यान उभारण्यात येणाऱ्या एलिवेटेड कंकोर्सच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ आणि स्वतंत्रपणे होणार आहे. जुन्या इमारतींचे पाडकाम, युटिलिटी शिफ्टिंग आणि पूर्व व पश्चिम दिशेला नवीन स्टेशन इमारतींचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची खासियत म्हणजे ऐतिहासिक इमारतीचे जतन व संवर्धन केले जात आहे. त्या इमारतीचे बाह्य भाग स्वच्छ करून, वॉटरप्रूफिंग, अंतर्गत सजावट व स्थापत्य लाईटिंगद्वारे तिची ओळख जपली जात आहे.

दृष्टीदोष असलेल्या प्रवाशांसाठी टॅक्टाइल पाथचे काम स्थानकावर विविध ठिकाणी सुरू आहे. आधुनिक शौचालये, प्रतीक्षागृहे व लिफ्ट्स यांसह सर्व सुविधा युनिव्हर्सल डिझाईन मानकांनुसार बांधण्यात येत आहेत. स्टेशनमध्ये कलात्मक भित्तिचित्रे, सजावटीच्या भिंती आणि डिजिटल साईनबोर्ड्सद्वारे सौंदर्यवृद्धी केली जात आहे.

नागपूर स्थानकाचा हा पुनर्विकास भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण, वारसा जतन आणि समावेशकतेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पूर्णत्वास आल्यानंतर हे स्थानक सर्व प्रवाशांसाठी जगातल्या सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सुलभ वाहतूक प्रदान करणारे एक मॉडेल स्थानक म्हणून उभे राहील.

Latest Posts

Don't Miss