विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Balharpur) : समाजातील अन्याय, अत्याचार, विषमता व मानवी हक्कांचे उल्लंघन याविरोधात सतत लढा देणाऱ्या अखिल भारतीय मानवाधिकार संघटना मार्फत राज्यस्तरीय नेतृत्वात महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी बल्लारपूर शहरातील गायत्री अनिल रामटेके यांची निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शिवदास नारायण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील तीन वर्षांसाठी जाहीर करण्यात आली. गायत्री रामटेके हे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
गायत्री रामटेके यांनी आजपर्यंत माता रमाई, सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माता यांच्या जीवनावर आधारित १६० हून अधिक एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, शिक्षण आणि सांस्कृतिक जागृतीच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
पुणे येथे १५ जुलै रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात गायत्री रामटेके यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शिवदास नारायण महाजन, एड. रामकृष्ण सेहगल (महाराष्ट्र राज्य सल्लागार), एड. विद्या बागडे (राष्ट्रीय उपाध्यक्ष – युथ),नागनाथ लष्करे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), शिवनारायण कुशवाह (सेक्रेटरी), महेश चाकणकर (राज्य उपाध्यक्ष – युथ) सह आदी मान्यवर उपस्थित होते.
गायत्री रामटेके यांची नियुक्ती ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या सर्व चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी व सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
