विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी देशातील असंघटीत/स्थलांतरित कामगारांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) देऊन त्यांची नोंदणी करण्यासाठी ई- श्रम पोर्टल सुरु केले आहे. यामुळे ई- श्रम पोर्टलवर नोंदीत झालेल्या असंघटीत/स्थलांतरित कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजना एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे.
देशातील लाखो कर्मचारी प्लॅटफॅार्म अर्थव्यवस्थेत काम करत आहेत, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई- श्रम पोर्टलवर प्लॅटफॅार्म कामगारांची व गिग कामगारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तशी नोंदणीची सुविधा ई- श्रम पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. प्लॅटफॅार्म कामगाराने ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास त्यांचा विविध कल्याणकारी योजनेत समावेश होईल.
ॲग्रीगेटर सेवांमध्ये राईड शेअरिंग सेवा, अन्न आणि किराणा माल वितरण सेवा, लॉजिस्टिक सेवा, वस्तु आणि/किंवा सेवांच्या घाऊक/किरकोळ विक्रीसाठी ई-मार्केट ठिकाण, व्यावसायिक सेवा प्रदाता, आरोग्यसेवा, प्रवास आणि आदरातिथ्य, सामग्री आणि मिडिया सेवा, इतर कोणतीही वस्तु आणि सेवा प्रदाता प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.
वर नमूद क्षेत्रातील एग्रीगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर (www.eshram.gov.in) नोंदणी (OnBoard) करण्याच्या सूचना विकास आयुक्त (असंघटीत कामगार) यांनी दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्हयात वर नमूद कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या एग्रीगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी ३१ मार्च २०२५ पूर्वी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी केले आहे.
