Latest Posts

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत नागपूर विभागाची सर्वोत्तम कामगिरी

– सर्वोत्तम विभागीय आयुक्त, नागपूर जि. प. सीईओ, चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि नागपूर व गोंदिया पोलीस अधिक्षक कार्यालयांनी मारली बाजी

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत नागपूर विभागाने सरस कामगिरी केली असून विभागातील पाच कार्यालये सर्वोत्तम ठरली आहेत. चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा हे राज्यातून पहिले तर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. नागपूर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार  आणि  गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. एकूण ९ श्रेणीमध्ये ३७ सर्वोत्तम कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात नागपूर विभागातील पाच कार्यालयांचा समावेश आहे.

या मूल्यमापनात सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेणीमध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १०० पैकी ७५. ८३ टक्के गुण मिळवून राज्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत एकूण पाच विजेते निवडण्यात आले आहेत.

सर्वोत्तम विभागीय आयुक्त या श्रेणीमध्ये नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने १०० पैकी ६२. १९ गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत एकूण दोन विजेते निवडण्यात आले असून नागपूर विभागीय आयुक्त आणि नाशिक आयुक्त यांना समान गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

सर्वोत्तम जिल्हाधिकारी या श्रेणीमध्ये १०० पैकी ६८. २९ गुण मिळवत चंद्रपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत एकूण पाच विजेते निवडण्यात आले आहेत.

सर्वोत्तम पोलीस अधीक्षक श्रेणीमध्ये नागपूर आणि गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयांनी अनुक्रमे १०० पैकी ६०.०० आणि ५६. ४९ गुण मिळवत तिसरा व चौथा क्रमांक फटकाविला आहे. या श्रेणीत एकूण पाच विजेते निवडण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

शासनाच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १००% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

Latest Posts

Don't Miss