विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : थोडा दिलासा देणारी उबदार हवा मागे पडताच विदर्भात पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच नागपूर शहरात पारा घसरून गुरुवारी ११ अंशांवर पोहोचला आहे, ज्यामुळे गारठा आणखी तीव्र झाला आहे. यासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही किमान तापमान १० अंशांपर्यंत घसरले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात तापमानाच्या या घसरणीचा रेट आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील नागरिकांना थंड हवामानाचा सामना करावा लागू शकतो.
डिसेंबर महिना सामान्यत: थंड असतो, पण नोव्हेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत आणि डिसेंबरच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत तापमानात वाढ झाली होती. मात्र, बुधवारी पासून पुन्हा थंडीने जोर धरला आहे. उत्तर भारतातही गेल्या काही दिवसांत कडाक्याची थंडी वाढली आहे, ज्यामुळे जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, झारखंड अशा अनेक भागांमध्ये थंड लाट निर्माण झाली आहे. पंजाबच्या आदमपूर शहरात तापमान ३ अंशांपर्यंत घसरले आहे.
गुरुवारी नागपूरचे रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशांनी कमी होते, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांनी कमी नोंदवले गेले. वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये तापमान १२ अंशांपर्यंत घसरले आहे, तर अमरावती, अकोला आणि गडचिरोलीमध्ये १३ अंशांवर तापमान आहे. चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक १४ अंशांवर आहे.
पुढील दोन दिवसांत विदर्भातील किमान तापमान आणखी २ ते ३ अंशांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे.
