विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / चंद्रपूर (Chandrapur): गोंडपिपरी तालुक्यातील आष्टी–विठ्ठलवाडा मार्गावर लॉयड्स मेटल यार्डजवळ झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गोंडपिपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विठ्ठलवाडा येथील रहिवासी आर्यन प्रेमानंद गोंगले (वय १९) हा त्याचा मित्र श्रेयश रविंद्र डोर्लिकर (वय २१) रा. अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली याच्यासोबत दुचाकी TVS Jupiter क्रं. एमएच ३३ एएच ९८६९ ने आष्टीकडून विठ्ठलवाड्याकडे येत होता. १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास आष्टी पुलाजवळील लॉयड्स मेटल यार्डमधून अशोक लेलँड १४ चाकी ट्रक क्रं टीएस १७ टी ३१३२ अचानक कोणताही सिग्नल न देता निष्काळजीपणे रस्त्यावर आणून वळण घेतल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत आर्यन व श्रेयश दोघेही दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. आर्यन गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला तर श्रेयश काही अंतरावर शेतात पडलेला आढळून आला. माहिती मिळताच मित्रपरिवार व घटनास्थळी असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दोघांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर आर्यन गोंगले यास मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या श्रेयशला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ भारतीय न्याय संहिता तसेच कलम १८४ मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक देविदास सुरपाम करीत आहेत. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी यार्ड परिसरात अवजड वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.
