Latest Posts

महावितरण अभय योजनेतून थकबाकीमुक्ती व पुनर्विजजोडनीची संधी : योजनेला केवळ उरले १३ दिवस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/चंद्रपूर Chandrapur : विजबिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित (परमनंट डिस्कनेक्ट) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्विजजोडनीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ १३ दिवस उरले आहेत.

आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत ३ हजार ८४५ लघु व उच्च दाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून त्यातील ३ हजार ५१९ वीजग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. थकीत वीजबिलांमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरू केली आहे.

त्यामध्ये कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणि आणखी १० टक्के तर उच्च दाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यात भरण्याची देखील सोय आहे. महावितरण अभय योजनेची मुदत येत्या ३१ डिसेंबरला-२०२४संपणार आहे. अभय योजनेमध्ये परिमंडळांतर्गत आतापर्यंत सहभागी ३ हजार ५१९ वीज ग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळ  कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. हरीश गजबे मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर.

Latest Posts

Don't Miss