विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): मानव–वन्यजीव संघर्षाचा सिलसिला चंद्रपूर जिल्ह्यात थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी पायली–भटाळी बीटात घडलेल्या आणखी एका हल्ल्यात चिंचोली येथील ५४ वर्षीय मजूर बाबा नारायण गेडाम यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
गेडाम रोजंदारीवर मजुरी करीत असून, नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास वनकक्ष क्रमांक ८०० परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. झुडपांनी वेढलेल्या या भागात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घालत त्यांना आत जंगलात ओढून नेले.
सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. ग्रामस्थांच्या मदतीने जंगलात शोध घेताना सायकल, रक्ताचे डाग आणि गेडाम यांचे साहित्य आढळून आले. याची माहिती दुर्गापूर पोलिस व वनविभागाला देण्यात आली. संयुक्त पथकाने शोधमोहीम राबविली असता कुऱ्हाड, चप्पल आणि रक्ताने माखलेले कपडे सापडले. अखेर रात्री उशिरा त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
या घटनेमुळे चिंचोली परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे वाघाच्या तातडीच्या बंदोबस्ताची आणि सुरक्षा उपाययोजनांच्या वाढीची मागणी केली आहे.
या वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हा ४० वा बळी असल्याने चिंता अधिक वाढली आहे.
