Latest Posts

उपाय सापडतो, फक्त विचाराची गरज : डॉ. भीमराव गोटे

– महाड सत्याग्रह स्मृती दिनानिमित्त व्याख्यान

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन आणि विचारधारा विभागाचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपुर(Nagpur) : उपाय सापडतो फक्त विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पदव्युत्तर शिक्षण विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. भीमराव गोटे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन आणि विचारधारा विभागात ९८ व्या महाड सत्याग्रह स्मृती दिनानिमित्त गुरुवार २० मार्च २०२५ रोजी व्याख्यान पार पडले. यावेळी डॉ. गोटे मार्गदर्शन करीत होते.

प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचे अध्यक्षस्थान विचारधारा विभाग प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी भूषविले तर व्याख्याते म्हणून पदव्युत्तर शिक्षण विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. भीमराव गोटे यांची उपस्थिती होती. महाड सत्याग्रह स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचे प्रतीक या विषयावर बोलताना डॉ. गोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाड सत्याग्रहानंतर थांबले नाहीत, ते पुढे गेले. संपूर्ण भारत बौद्धमय करणे आणि शासनकर्ता समाज म्हणून उभे राहणे, हे त्यांचे ध्येय होते. आपल्याला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. विचार करायला हवा की, आज बाबासाहेब असते तर त्यांनी काय केले असते? आपण एका नेतृत्वाखाली यायला हवे. समाज एकत्र कसा येईल, यावर विचार करावा लागेल.

एकमेकांचे ऐकण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. जर नेतृत्वाचे ऐकू शकत नसेल तर एक मंडळ तयार करून सामूहिक निर्णय घ्यावा लागेल. उपाय सापडतो, फक्त विचार करण्याची गरज आहे. विचार करा आणि इतरांनाही विचार करण्यास प्रवृत्त करा असे डॉ. गोटे यांनी सांगितले. डॉ. गोटे पुढे म्हणाले चवदार तळ्याचा पाणी पिण्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता. तो आपणही माणूस आहोत, हे दाखवण्यासाठी होता. कार्यक्रमाचे अध्यक्षीय विचार डॉ. अविनाश फुलझेले यांनी व्यक्त केले. संचालन दिलीपकुमार लेहगांवकर यांनी केले तर आभार ॲड. वनिता मेश्राम यांनी मानले.

Latest Posts

Don't Miss