Latest Posts

टीसीओसी कालावधी दरम्यान ०२ जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

– शासनाने जाहिर केले होते एकुण १८ लाख रूपयांचे बक्षिस

– एक डीव्हीसीएम (Divisional Committee Member) व एक सदस्य पदावरील माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ७०२ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ०१ डी.व्हि.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यासह ०१ सदस्य असे एकुण ०२ जहाल माओवादी १) कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो, (डी.व्हि.सी.एम. सप्लाय टीम), (५६), रा. गुडंजुर (रिट), ता. भामरागड, जि. गडचिरोली व २) सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (दलम सदस्य, भामरागड दलम), (३०), रा. मिळदापल्ली ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
१) कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो
दलममधील कार्यकाळ –
– सन १९९३ मध्ये मद्देड दलममध्ये भरती होवून १९९५ पर्यंत काम केले.
– सन १९९५ ते १९९८ पर्यंत उत्तर गडचिरोलीतील प्लाटुन क्र. ०२ मध्ये सदस्य पदावर काम केले.
– सन १९९८ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन २००१ पर्यंत सदस्य पदावर काम केले. I
– सन २००१ मध्ये उप-कमांडर पदावर पदोन्नती होऊन पेरमिली दलममध्ये सन २००३ पर्यंत काम केले.
– सन २००३ मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन २००६ पर्यंत उप-कमांडर पदावर काम केले.
– सन २००६ मध्ये एसीएम (Area Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये २००८ पर्यंत काम केले.
– सन २००८ मध्ये डिव्हीसीएम (Divisional Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड, चातगाव व कसनसुर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये २०१५ पर्यंत काम केले.
– सन २०१५ मध्ये माड एरीयामध्ये स्टाफ/सप्लाय टिममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपावेतो काम केले.

कार्यकाळात केलेले गुन्हे –
कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर आजपर्यंत एकुण ११ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०७चकमक, ०१ जाळपोळ व ०३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

२) सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी
दलममधील कार्यकाळ –
– सन २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे सप्टेंबर २०२४ पर्यंत काम केले.
– माहे सप्टेंबर २०२४ मध्ये डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून आजपावेतो काम केले.

कार्यकाळात केलेले गुन्हे –
सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर ०१ चकमकीचा गुन्हा दाखल असून इतर गुन्हयांत त्याच्या सहभागाची पडताळणी सुरु आहे.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे –
– गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते.
– नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्या जात नाही.
– चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
– खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
– माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडून स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
– दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता /जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतः साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
– वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस –
– महाराष्ट्र शासनाने कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर १६ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
– महाराष्ट्र शासनाने सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस –
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिला एकुण ८.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकुण ५५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन २०२५ साली आतापर्यंत एकुण २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व परविंदर सिंग, कमांडंट १९२ बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

Latest Posts

Don't Miss