विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मागील साडेतीन वर्षांत झालेल्या एकूण अपघातात दगावणाऱ्या नागरिकांमध्ये ८७ टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकारातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यात एकूण १४ हजार १७० अपघात झाले. त्यात ११ हजार ८९८ नागरिक जखमी तर ७ हजार २२९ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंमध्ये ६ हजार ३२६ महिलांचा समावेश आहे. माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांनी हा तपशील पुढे आणला आहे. महिलांच्या एकूण मृत्यूमध्ये २०२१ मध्ये १ हजार ३६८, २०२२ मध्ये १ हजार ६३२, २०२३ मध्ये १ हजार ८६७ तर जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान १ हजार ४५९ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
१८ वर्षांखालील १ हजार २२९ जणांचा मृत्यू –
राज्यात २०२१ ते २०२३ दरम्यान रस्ते अपघात दगावणाऱ्यांमध्ये १८ वर्षांखालील १ हजार २२९ जणांचा समावेश आहे. २०२१ मध्ये ३७३ मृत्यू, २०२२ मध्ये ४५४ मृत्यू, २०२३ मध्ये ४०२ मृत्यूंचा समावेश आहे.
रस्ते अपघातातील सर्वाधिक मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर –
राज्यात राष्ट्रीय महामार्गांवर २०२१ मध्ये ७ हजार ५०१ अपघातात ४ हजार ८० मृत्यू झाले. राज्य महामार्गावर ६ हजार ३२८ अपघातात ३ हजार ४११ लोकांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर ९ हजार ४१७ अपघातात ४ हजार ९२३ लोकांचा मृत्यू झाला. तर राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. २०२३ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर १० हजार ८८१ अपघातात ५ हजार ७८० मृत्यू झाले. राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. जानेवारी २४ ते ऑक्टोबर २४ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ९ हजार ३४८ अपघातात ४ हजार ६८१ मृत्यू झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. त्यामुळे राज्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यू जास्त असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
