Latest Posts

श्रीचक्रधर स्वामींच्या मुल्यविचारांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा : डॉ. राजेंद्र वाटाणे

– वारसा महानुभाव साहित्याचा या उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस    

प्रतिनिधी / नागपूर : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या मुल्यविचारांचा नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात समावेश व्हावा, असे विचार तायवाडे महाविद्यालय कोराडी येथील डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्रीचक्रधर स्वामी अध्यासनाद्वारे वारसा महानुभाव साहित्याचा या उपक्रमांतर्गत महानुभाव साहित्यातील मुल्यविचार या विषयावर विशेष व्याख्यान शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी भगवान श्रीचक्रधर स्वामी अध्यासन, गांधी भवन नागपूर येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. वाटाणे बोलत होते.

मराठीतील संपूर्ण वाड्मयप्रकार महानुभाव साहित्यात दिसून येतात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सुमारे ८०० वर्षांपूर्वी सत्य, अहिंसा, समता, बंधूता, प्रेमभाव, राष्ट्रभावना, सहिष्णुता, भुतदया, वक्तशिरपणा, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन इ. नैतिक मुल्यांची पेरणी केली असल्याचे डॉ. वाटाणे यांनी पुढे बोलताना सांगितले. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानातील मुल्यविचारांची अभिव्यक्ती विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचे महत्वपूर्ण कार्य शिक्षण विभागाला करावे लागणार आहे. यातूनच नवी पिढी माणूस म्हणून घडेल असे विचार अध्यासनाचे प्रमुख प्रा. भारतभूषण शास्त्री यांनी व्यक्त केले. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी अनेक लीळांमधून मुल्यविचार दिले आहे. महानुभाव साहित्याला भक्तीतत्वांची व मानवतेची जोड लाभल्याने महानुभाव साहित्य आजही लोकाभिमुख साहित्य ठरते आहे, असे विचार महानुभाव साहित्याच्या अभ्यासिका डॉ. विजया राऊत यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पू. महंत श्रीदेगावकरबाबा यांनी केले. संचालन तृषाल रामटेके यांनी केले तर आभार डॉ. प्रतिभा कोकाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, प्रसन्नमुनी खंदारकर, ज्ञानेश्वर हेमणे, खांडेकर, रूपराव उके, छत्रपती शेंडे, ताम्रध्वज खोब्रागडे, राजकुमार शेंडे, विक्की डहाट, केतकी खोब्रागडे, रजनी गजभिये यांच्यासह महानुभाव साहित्य व तत्वज्ञानाचे अभ्यासक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss