विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : समाज कल्याण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक व व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कारांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पुर्तता करणे आवश्यक राहील. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रासह संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया व प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
