विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवनगौरव पुरस्कारासोबतच महत्वाचे क्रिडा पुरस्कार देण्यात येतात. २०२३-२४ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी २६ जानेवारीपर्यंत क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रिडा महर्षि करीता जीवन गौरव पुरस्कार, क्रिडा मार्गदर्शकांकरीता क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रिडा मार्गदर्शकांकरीता महिला क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू करीता शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येत असून २९ डिसेंबर २०२३ व २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिवछत्रती राज्य क्रिडा पुरस्कार सुधारीत नियमावली नुसार ऑनलाईन अर्ज सादर करावे.
संबंधितांनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज आणि माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावी. पुरस्काराच्या पात्रतेचे निकष आणि अधिक माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांनी कळविले आहे.
