Latest Posts

रेल्वेच्या धडकेत सात वर्षीय वाघिणीचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): बल्लारशहा–चेन्नई डाउन रेल्वेमार्गावर मालगाडीची धडक बसून सात वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. राजुरा वनविभागाच्या चनाखा बिटातील विहिरगाव राऊंड (कक्ष क्र.१६०) येथे पहाटे चारच्या सुमारास ही दुर्घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघिण रेल्वे रुळ ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या मालगाडीने तिला जोरदार धडक दिली आणि ती जागीच ठार झाली. वाघिणीचा मृतदेह रुळाच्या उजव्या बाजूला आढळून आला. घटना पाहताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी तसेच वन विभागाला कळविले.

दरम्यान, उपविभागीय वन अधिकारी एम. डी. गिरडकर आणि राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पंचनाम्यात वाघिणीचे दात व सर्व अवयव शाबूत असल्याचे स्पष्ट झाले.

वन विभागाने वाघिणीचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे रवाना केला असून या प्रकरणी पुढील तपास व कार्यवाही राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे करीत आहेत. वारंवार होणाऱ्या अशा घटना लक्षात घेता रेल्वे मार्ग व वन्यजीवांचा संघर्ष अधिक गंभीर बनत चालल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss