विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बेरोजगार मुलामुलींना स्वयंरोजगारासाठी व तांत्रिक व्यवसाय सुरु करण्याबाबत तीन महिन्याचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेअंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १ हजार प्रतिमाह प्रमाणे ३ हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळामार्फत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार उभारण्यासाठी भांडवल देण्यात येत असून ५० हजारपर्यंत अनुदान सुध्दा उपलब्ध होणार आहे. महामंडळाच्या https://www.nbrmahapreit.in/home या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
आवश्यक कागदपत्रे –
शाळा सोडल्याचा दाखला, दहावी किंवा बारावीची मार्कशिट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँकेचे), दोन छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत जोडावे. अधिक माहितीसाठी शतम घरडे मो.क्र. ९२८४८८४४५५/ ०१२-२२३८६५५ वर संपर्क साधावा.
