Latest Posts

निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या चंद्रपूर होमगार्ड जवानांची बस पलटी : एक जवान गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका निवडणूक ड्युटी आटोपून चंद्रपूरकडे परतणाऱ्या होमगार्ड जवानांची बस नांदेड जिल्ह्यात आज १८ जानेवारी रोजी दुपारी अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत एका होमगार्ड जवानाला गंभीर दुखापत झाली असून त्यास पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जवानांना किरकोळ दुखापत झाल्याने नांदेड येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, बस क्रमांक एमएच ०३ सीपी ३२७९ मधून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ४० ते ४५ होमगार्ड जवान निवडणूक ड्युटी पूर्ण करून परतत होते. नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत अचानक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस व प्रशासनाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर पोलीस प्रशासन नांदेड येथील प्रशासनाच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

बस अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे होमगार्ड जवानांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. एका होमगार्ड जवानाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यास नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इतर जवानांना किरकोळ दुखापत झाली असून नांदेड येथे उपचार सुरू आहेत, असे मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss