विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur): रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने ट्रक मधून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या व जॅक प्रकरणात दोन आरोपींना अटक करून जवळपास ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सप्रेम लेमचंद दुर्गे (१९), रा. एमआयडीसी हनुमान नगर, चंद्रपूर, अख्तर गुलाम हुसेन (२०) , रा. म्हाडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर असे आरोपींचे नाव आहे.
फिर्यादी करण अर्जुन झामरे, रा. कोसारा, चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबरच्या रात्री त्यांच्या एमएच ३४ एम ८६७४ व एमएच ३४ एबी ३८५९ या दोन ट्रकांमधील बॅटऱ्या आणि हायड्रॉलिक जॅक अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. २१ नोव्हेंबरला ही चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने दाताळा रोड परिसरात नाकाबंदी केली असता दोन तरुण मोटारसायकलवर बॅटऱ्या घेऊन जाताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या ५ बॅटऱ्या, ३ हायड्रॉलिक जॅक, १ साधा जॅक तसेच स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रं एमएच ३४ सीजी ६११० असा एकूण ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात स.पो.नि. देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोहवा. आनंद खरात जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालु यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, रामप्रसाद नैताम, मपोहवा. मनिषा मोरे, पो.अं. रविकुमार डेंगळे,पंकज ठोंबरे, प्रफुल पप्पुलवार, संदिप कामडी, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, व म.पो.अं. ब्ल्युटी साखरे यांनी केले.
