Latest Posts

पांढुर्णा (खुर्द) येथे पत्नीच्या प्रियकराचा पतीने केला खून : संशयित आरोपी निलेश ढोणे अटकेत

– घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु.) येथील घटना

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खु.) येथे मंगळवारी मध्यरात्री एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराला संपविले. या घटनेमुळे पांढुर्णा (खु.) परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशाल जगन रंदई (वय ३७, रा. पांढुर्णा खु.) याचे निलेश अरुण ढोणे (३५, रा. पांढुर्णा खु.) याच्या पत्नीशी अंदाजे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात सुरू होती. पत्नीच्या वागणुकीबद्दल त्याला काही दिवसांपासून संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. याबाबत खात्री झाल्यावर निलेश ढोणे याने मंगळवारी रात्री विशाल रंदईला गावात एकांत ठिकाणी बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. वादा दरम्यान रागाच्या भरात निलेशने लाकडी दांड्याने रंदईवर वार केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यात रंदईचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पहाटे चार वाजताच्या सुमारास गावचे पोलीस पाटील विशाल अहिरकर यांनी गावातील सिमेंट रस्त्यावर मृतदेह पडलेला पाहिला. त्यांनी याबाबत मृताच्या कुटुंबीयांसह पोलिसांना कळविले. पोलिसांनी प्राथमिक तपासणी करून मृताचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यावरील शेवटचा कॉल कोणाला केला, याची माहिती घेतली.

संबंधित व्यक्तीच्या पत्नीशी मृताचे दोन वर्षांपासून संबंध असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी संशयिताचा शोध सुरू केला. आरोपी पांढुर्णा रस्त्यावरील एका शेडमध्ये झोपून असल्याचे पोलीसांना आढळले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेनंतर पोलिसांनी मृताचा पंचनामा केला.

घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड हे पुढील तपास करीत आहे.

Latest Posts

Don't Miss