विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपूर–मूल महामार्गावर आज सकाळी मामला डेपो जवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ३९५ मध्ये एका भल्या मोठ्या नर रानगव्याचा कारच्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. अंदाजे ८५० किलो वजन असलेल्या रानगव्याच्या मृत्यूने वन्यजीव संरक्षणाबाबत चिंतेची लाल दिव्याची चेतावणी पुन्हा एकदा समोर आली आहे.
हा महामार्ग वन्यजीवांसाठी संवेदनशील असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले असून, या मार्गावर यापूर्वीही असंख्य प्राणी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. नुकत्याच केसलाघाट आणि हनुमान मंदिराजवळील भागात वाघीणीच्या पिल्लाचा संशयित मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर महामार्गावरील वाहनचालकांवर तुटून पडणाऱ्या वाघीणीचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. मात्र, नमुने DNA तपासणीसाठी पाठवूनही वनविभागाकडून अद्याप निकाल जाहीर झालेला नाही.
हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी सांगितले की, या महामार्गावर आतापर्यंत फक्त लोहारा परिसरातच पाच रानगवे तर डोनी फाट्याजवळ आणखी एका रानगव्याचा मृत्यु झाला आहे. या मार्गावर दररोज एखादा वन्यप्राणी अपघातात मरतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कावल व्याघ्र प्रकल्प–कन्हाळगाव अभयारण्य–ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प–उमरेड-करहांडला अभयारण्य यांना जोडणारा हा महामार्ग वन्यजीवांसाठी महत्त्वाचा भ्रमणमार्ग आहे. रोड इकॉलॉजिस्ट मिलिंद परिवाकाम यांनी वनविभागासोबत मिळून अनेक उपशमन (मिटिगेशन) योजना तयार केल्या होत्या. या योजनांना मंजुरी मिळूनही ‘निधीअभावी’ त्या प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. कोठारी–आकसापूर मार्गालाही अशीच स्थिती आहे.
सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी महामार्गालगत वाढलेला कचरा, वाढता वेग आणि वन्यजीवांच्या हालचालींवर होणारा परिणाम याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र कोणतीही प्रभावी दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. परिणामी आज आणखी एका रानगव्याचा बळी गेले.
घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, अमित देशमुख, रणवीर गौतम, राहील अली तसेच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनालकर, क्षेत्र सहाय्यक कबले, वनरक्षक मत्ते आणि पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडसेलवार उपस्थित होते.
तत्काळ उपशमनाची मागणी वन्यजीवांच्या सततच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपशमन योजना राबवून वन्यजीवांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी स्थानिक पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
