विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढविणे आणि बियाणे बदलाचे महत्व लक्षात घेता सुधारित वाणांचे प्रसार करण्यासाठी प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे. भुईमुग पिकासाठी प्रति हेक्टर १५० किलो तर तीळ पिकासाठी प्रति हेक्टर २.५ किलो बियाणे अनुज्ञेय राहील.
क्षेत्र कमी असल्यास काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाण्याची पिशवी घ्यावी. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची निवड झाल्यास पॅकिंग साईज फोडणे शक्य नसल्याने, पिशवीतील उर्वरित बियाण्यासाठी शेतकऱ्यांना बाजारभावानुसार रक्कम विक्रेत्याला देणे बंधनकारक राहील.
१००% अनुदानावर बियाणे उपलब्ध –
प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून उन्हाळी भुईमुग आणि उन्हाळी तीळ या दोन्ही पिकांसाठी बियाणे १००% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कोण अर्ज करू शकतात? –
उन्हाळी भुईमुग पिकासाठी: नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी.
उन्हाळी तीळ पिकासाठी: जळगाव, बीड, लातूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी.
अर्ज प्रक्रिया –
शेतकऱ्यांना अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येतील:
https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgrilLogin
बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत अर्ज भरावयाचा आहे.
महत्वाची अट –
अर्जदार शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी अनिवार्य आहे.
लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर केली जाईल.
कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
