विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोंडपिपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
१ मार्च २०२६ रोजी पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, बोलेरो पिकअप वाहनातून विठ्ठलवाडा मार्गे भंगाराम-तळोधी गावाकडे गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून संशयित बोलेरो पिकअप क्रं. टी एस २० टी ६८५७ ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १० गोवंशीय जनावरे आढळून आली. यापैकी २ जनावरे मृत अवस्थेत तर ८ जिवंत जनावरे आढळली. जप्त जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार रुपये असून बोलेरो पिकअप वाहनाची किंमत अंदाजे ७ लाख रुपये व आरोपीकडील मोबाईल फोन किंमत ८ हजार रुपये असा एकूण ८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहन चालक सुदाम रामजी जाधव (वय ३७), रा. अंदुगुडा, ता. गुडामामडा, जि. आदिलाबाद यास अटक करण्यात आली असून वाहन मालक मोहम्मद मुजताब अली रा. वाकडी, जि. आसीफाबाद याचा तपास सुरू आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे अप. क्र. १२५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(ब), ९, ११, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(५) तसेच भा.दं.वि. कलम ३२५ व म.पो.का. कलम ११९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले व ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोकुलदास मडावी, पोलीस अंमलदार प्रविण कडुकर, आकाश गुंजकर व चालक सहाय्यक फौजदार पुनेश्वर कुळमेथे यांनी पार पाडली.
पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
