विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेले अल्पवयीन जोडपे काही दिवसांनी स्वगावी परतल्यानंतर पालकांच्या संमतीने त्यांचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची घटना गडचांदूर शहरालगतच्या एका गावात उघडकीस आली.मात्र चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त झालेल्या गोपनीय तक्रारीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास विभागाने तात्काळ कारवाई करत होऊ घातलेला बालविवाह यशस्वीपणे रोखला.
कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय किमान २१ वर्षे व मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तथापि संबंधित प्रकरणात मुलाचे वय अवघे १७ वर्षे ७ महिने असल्याचे निष्पन्न झाले. प्रेमप्रकरणातून घरून पळून गेलेल्या मुलाच्या जिद्दीसमोर पालक नमते घेत विवाह करण्याच्या तयारीत होते. शुक्रवारी विवाह होणार असल्याची माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष सतर्क झाला.
तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहूर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चाइल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर अंकुश उराडे, सुपरवायझर प्रणाली इंदुरकर, गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील तायडे, पोलीस पाटील तसेच अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने संबंधितांना समजावून सांगत बालविवाह रोखला.
बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार संबंधित पक्षांचे समुपदेशन करण्यात आले. बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्ट करून पुन्हा असा प्रकार न करण्याबाबत त्यांच्याकडून हमीपत्रही घेण्यात आले.
बालविवाह ही बेकायदेशीर व समाजघातक प्रथा असून अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी केले आहे.
