– अन्नत्याग सत्याग्रहाचा पाचवा दिवस : मानव-वन्यजीव संघर्ष निवारण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात वाढत चाललेल्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच ताडोबा परिसरातील महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडॉरला धोका निर्माण करणाऱ्या प्रस्तावित लोहारडोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेला अन्नत्याग सत्याग्रह पाचव्या दिवशीही सुरूच आहे. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सोमवारी आंदोलनस्थळी अर्धनग्न आंदोलन केले.
जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत होणारे मृत्यू, वाढता मानव–वन्यजीव संघर्ष आणि ताडोबा परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन हा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून लोहारडोंगरी खाण प्रकल्प रद्द करणे तसेच मानव–वन्यजीव संघर्ष निवारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अर्धनग्न आंदोलनात योगेश दुधपचारे, अविनाश पोइनकर, अब्दुल जावेद, अनिल अडगुरवार, आकाश घोडमारे, गौरव कुषमवार, कुणाल देवगीरकर, सुनील पाटील, धर्मेंद्र लुणावत, सुमित कोहळे, सुनील लिपटे, विजय हेडाऊ, सचिन धोतरे, राजू काहिलकर, हरीश मेश्राम, सनी दुर्गे, रुद्राक्ष धोतरे, संदीप इंगोले, किशोर जामदार आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. रोटरी क्लब चंद्रपूर, जिजाऊ ब्रिगेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिआयटीयू, संभाजी ब्रिगेड या संस्थांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन जाहीर केले. काल सायंकाळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले व डॉ. अशोक जिवतोडे यांनीही उपोषण मंडपाला भेट देत धोतरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
आज जयश्री कापसे, कॉ. रमेशचंद्र दहिवडे, अर्चना चौधरी, दिलीप चौधरी, अतुल वासुदेव, डॉ. विजय आइंचवार, मनीष बोराडे, राजेश पिंजरकर, लुकेश निमगडे, गंगासागर हेटी, संदीप रामटेके, संतोष तेलंग, निखिल तांबेकर, परशुराम तोडासे आदी मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले.
यावेळी आंदोलनात सहभागी असलेले अब्दुल जावेद म्हणाले, बंडू धोतरे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज अर्धनग्न आंदोलन केले.
