विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): विसापूर फाटा रोडवरील वननर्सरीसमोरील बॉटनिकल गार्डनच्या आवार भिंतीजवळ रविवारी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने गायीच्या एका वर्षाच्या बछड्याची शिकार केल्याची घटना घडली. भर रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गस्तीवर असलेल्या वनरक्षक वर्षा पिंपरे व वाचर नंदू गिरडकर यांनी शिकार झाल्याचे लक्षात येताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बॉटनिकल गार्डनचे सुरक्षा रक्षक सौरभ गिरसावळे, विशाल ठाकरे, खुशाल गिरडकर व महेश हिवरे यांच्या मदतीने प्रवाशांना सावध केले व नागरिकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
घटनेची माहिती बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बछड्याचा पंचनामा करण्यात आला. बिबट पुन्हा त्या ठिकाणी आकर्षित होऊ नये यासाठी मृत प्राण्याच्या शवाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून या परिसरात बिबट्याची वर्दळ वाढल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. बिबट कधी बॉटनिकल गार्डनच्या भिंतीवर, तर कधी राखट डेपो किंवा विटाभट्टी परिसरात फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.
गावातील मांस-मटण दुकानांमधील जैविक कचरा पुलाजवळील रापट भागात टाकला जात असल्याने त्या वासामुळे बिबट अन्नाच्या शोधात येथे येत असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीला पत्र देऊन लक्ष वेधण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी दिली.
मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनासह आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
